श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्धिंचा तसेच अफगानिस्तानचा पराभव करत बांग्लादेशने अंतिम सामन्यांत धडक मारली होती. आता त्यांचा सामना होता तो भारतीय संघाशी. अफगानिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने तर बांग्लादेशचा संघ पहिल्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या विजेतेपदक मिळवण्याच्या मैदानात उतरला होता.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत बांग्लादेशला फलंदाजीस निमंत्रीत केले होते. बांग्लादेशने लिटन दास सोबत मेहंदी हसनला सलामीला पाठवत सर्वांना आश्चर्यचकित केले. पण बांग्लादेशचा मेहंदी हसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय फायद्याचाच ठरला आणि लिटन दास व मेहंदी हसनने २०.५ षटकांत १२० धावांची सलामी दिली. भारतासाठी धोकादायक ठरणारी भागिदारी केदार जाधवने तोडली. त्यानंतर पुढील ३१ धावांत बांग्लादेशने आणखी ४ गडी गमावले आणि बिनबाद १२० वरुन बाग्लांदेशची अवस्था ३२.२ षटकांत ५ बाद १५१ झाली होती. यानंतर भारतीय संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची जिम्मेदारी पहिलेच शतक झळकावणाऱ्या लिटन दास व सौम्या सरकारवर होती पण लिटन दास ११७ चेंडूत १२१ धावा काढुन बाद झाला तर सौम्या सरकारने ३३ धावांची खेळी करत धावसंख्या २२२ पर्यंत पोहचवली. लिटन दास, मेहंदी हसन व सौम्या सरकार वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठु शकला नाही. भारतासाठी कुलदीप यादवने ३ बळी, केदार जाधवने २ बळी तर जसप्रित बुमराह व यजुवेंद्र चहलने प्रत्येकी १ बळी घेतला.
भारतीय सलामीवीरांची कामगिरी पाहता २२३ धावांच आव्हान तसं जास्त नव्हंत पण क्रिकेटमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या संघापेक्षा १ धाव जास्तच करावी लागते. रोहित शर्मा व शिखर धवनने ४.४ षटकांत ३५ धावांची सलामी दिली त्यांनतर भारतीय संघाची अवस्था ७.३ षटकांत २ बाद ४६ झाली होती नंतर दिनेश कार्तिकने रोहित शर्मा (४८) सोबत तीसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची तर धोनी (३६ )सोबत चौथ्या गड्यासाठी ५४ धावांची भागिदारी केली. पण कर्तिक व धोनी थोड्या अंतराने बाद झाले आणि भारतीय संघाची अवस्था ३६.१ षटकांत ५ बाद १६० झाली होती.
भारताला विजयासाठी ८३ चेडुत ६३ धावांची आवश्यता होती.आता संघाची जिम्मेदारी पुर्णपणे केदार जाधव व रविंद्र जडेजावर होती. तर १६७ च्या धावसंख्येवर केदार जाधवला मांडीचे स्नायु दुखावल्याने मैदान सोडावे लागले हा भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. रविंद्र जडेजा व भुवनेश्वर कुमारने ६ व्या गड्यासाठी ४५ धावांची भागिदारी केली आणि भारताला विजयासमीप पोहचवले पण २ धावांच्या अंतराने रविंद्र जडेजा (२३) व भुवनेश्वर कुमार (२१) बाद झाले. रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर दुखापतग्रस्त केदार जाधव पुन्हा एकदा मैदानावर आला आणि त्याला साथ होती ती कुलदिप यादवची.
भारताला शेवटच्या षटकांत ६ धावांची आवश्यकता होती. ५ चेंडूत ५ धावा काढल्यानंतर शेवटचा चेंडू केदारच्या पॅडला लागुन शॉर्ट फाइन-लेगला गेला आणि केदार व कुलदिपने १ धाव घेत भारताने ३ गड्यांनी विजय मिळवला आणि सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. बांग्लादेशसाठी मुस्तफिजुर रहेमान व रुबेल हसनने प्रत्येकी २ गडी बाद केले तर नझमुल इस्लाम, मशरफे मोर्तझा व महमुदुल्लाहने प्रत्येकी १ गडी बाद केला. लिटन दासला १२१ धावांसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर शिखर धवनला मालिकेतील ३४२ धावांसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
Leave a Reply