संपुर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला कर्नाटकचा संघ आणि स्पर्धेत फक्त एका सामन्यांत पराभव स्विकाराव्या लागलेल्या महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत धडक मारली होती. कर्नाटकने सुपर लिगमध्ये मुंबई, विदर्भ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा तर महाराष्ट्रने बंगाल, झारखंड, गुजरात आणि रेल्वेचा पराभव केला. कर्नाटकचा कर्णधार मनिष पांडेनी नाणेफेक जिंकत महाराष्ट्राच्या संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कर्नाटकच्या संघात कर्णधार मनिष पांडे, मयंक आगरवाल, करुन नायरचा समावेश असल्याने कर्नाटकचा संघ कागदावर भक्कम दिसत होता.
फलंदाजीस आलेल्या ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठीने संघाला सावध सुरावत करुन दिली पण अभिमन्यु मिथुनने ऋतुराज गायकवाडला बाद करत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. त्यानंतर महाराष्टाने आणखी दोन गडी गमावले तेव्हा महाराष्ट्राची अवस्था ९.३ षटकांत ३ बाद ५५ झाली होती. अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला संकटातुन सावरण्याची जिम्मेदारी नौशाद शेख आणि अंकित बावनेवर आली होती. नौशाद शेख आणि अंकित बावने हळु-हळु धावसंख्या पुढे नेत होते. बावणे पेक्षा नौशाद शेख जास्त आक्रमक दिसत होता. बघता-बघता या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावा जोडल्या. मिथुनने बावणेला बाद करत संघाला चौथा धक्का दिला. शेवटी महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावत १५५ धावा केल्या. नौशाद शेख ६९ धावा काढुन नाबाद राहिला. कर्नाटककडुन अभिमन्यु मिथुनने सर्वाधिक २ गडी बाद केले.
१५६ धावांच यशस्वीरीत्या संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राला सुरुवातीला गडी बाद करण्याची आवश्यकता होती तशी समद फल्लाहने शरथला बाद करत करुन दिली होती पण त्यानंतर रोहन कदम व मयंक आगरवालने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. या दोघांनी सर्वच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहन कदम व मयंकची जोडी कर्नाटकला विजय मिळवुन देईल असे दिसत असतानाच १३ व्या षटकांत रोहन कदम ६० धावांवर बाद झाला तेव्हा कर्नाटकला विजयासाठी ७.५ षटकांत ५० धावांची आवश्यकता होती. पण कर्नाटकसाठी जमेची बाजू होती ती म्हणजे मयंक आगरवाल खेळपट्टीवर ठाण मांडुन होता. त्याने करुन नायरसोबत ५३ धावांची भागिदारी करत संघाला ८ गड्यांनी विजय मिळवुन देत कर्नाटकला पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषक जिंकुन दिला. मयंक आगरवाल ८५ तर करुन नायर ८ धावांवर नाबाद राहिला. महाराष्ट्राकडुन समद फल्लाह आणि दिव्यांग हिमगणेकरने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत ५७ चेंडूत नाबाद ८५ धावांची खेळी केलेल्या मयंक आगरवालला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.
सय्यद मुश्ताक अली चषक २०१९
सर्वाधिक धावा – रोहन कदम (महाराष्ट्र) ५३६ धावा
सर्वाधिक बळी – सत्यजित बच्चाव (महाराष्ट्र) २० बळी
सर्वोच्च धावा – श्रेयस अय्यर (मुंबई) १४७ वि. सिक्कीम
सर्वोच्च धावसंख्या – मुंबई २५८/४ वि. सिक्कीम
सर्वाधिक शतके – श्रेयस अय्यर (मुंबई) आणि इशान किशन (झारखंड) – २
सर्वाधिक अर्धशतके – रोहन कदम (महाराष्ट्र) ५
सर्वोच्च गोलंदाजी पृथ्थकरण – विकास यादव (सर्विसेस) ५/९ वि. उत्तराखंड
Leave a Reply