पहिले दोन सामने एकतर्फी झाल्यानंतर न्युझिलंड व श्रीलंकेतला सामना कसा होतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य होते. श्रीलंकेचा नवनिर्वाचित कर्णधार दिमुथ करुणारत्ने संघाचे नेतृत्व कसे करतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कालच्या सामन्यांत वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती त्यामुळे श्रीलंकेच्या युवा फलंदाजांसमोर ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी व लॉकी सॅंटनरचे आव्हान होते. न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दुखापतग्रस्त असल्याने टिम साउदीला संघात स्थान मिळाले नव्हते.
पहिल्याच चेंडूवर चौकार मारत थिरामानेनी शानदार सुरुवात केली होती पण हेनरीने दुसऱ्याच चेंडूवर थिरीमानेला बाद करत संघाला पहिले यश मिळवुन दिले. त्यानंतर कर्णधार करुनारत्ने व कुसल परेराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गड्यासठी ४२ धावा जोडल्यानंतर ९ व्या षटकांत हेनरीने श्रीलंकेला २ धक्के दिले आणि श्रीलंकेची अवस्था ३ बाद ४६ झाली होती. आता संघाची जिम्मेदारी खेळपट्टीवर ज बसलेल्या करुणारत्नेवर होती पण दुसऱ्या बाजुने त्याला साथ लाभली नाही. १५.२ षटकांत ६ बाद ६० अशी अवस्था झाली असताना करुणारत्नेनी थिसरा परेराला साथीला घेत ७ व्या गड्यासाठी ५२ धावा जोडल्या पण सॅंटनरने परेराला बाद करत ही जोडी तोडली. करुणारत्ने ५२ धावांवर नाबाद राहिला पण तो संघाला १३६ धावांपर्यंत पोहचवु शकला. न्युझिलंडकडुन फर्ग्युसन व हेनरीने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
१३७ धावांचा पाठलाग करण्यास उतरणाऱ्या गुप्टील व मुनरोकडुन धमाकेदार सुरुवातीची अपेक्षा होती आणि तशीच सुरुवात त्यांनी दिली. १३७ धावांच संरक्षण करण्यासाठी श्रीलंकेला सुरुवातीला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती पण यात अनुभवी गोलंदाज मलिंगा, लकमल पुर्णपणे अपयशी ठरले. गुप्टील व मुनरोने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. ६ षटकांत बिनबाद ४० धावा केल्याने न्युझिलंडचा संघ किती षटकांत विजय संपादन करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. गुप्टीलने ३९ चेंडूत तर मुनरोने ४१ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्यानंतर न्युझिलंडच्या सलामी जोडीने १६ षटकांत तब्बल १० गडी राखुन विजय मिळवुन देत विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. गुप्टील ७३ तर मुनरो ५७ धावांवर नाबाद राहिले. २९ धावांत ३ गडी बाद करत श्रीलंकेच्या फलंजादीला भगदाड पाडणाऱ्या मॅट हेनरीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply