३० मे पासुन विश्वचषक २०१९ ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे पण क्रिकेट रसिकांच लक्ष्य लागुन राहिलं आहे ते म्हणजे भारत व पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्ध्यांत मॅंचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यांकडे. दोन विजय व एक सामना रद्द झाल्याने भारताकडे ५ गुण आहेत तर एक विजय, दोन पराभव व एक सामना रद्द झाल्याने पाकिस्तानकडे ३ गुण आहेत. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघ इतर संघांशी प्रत्येक एक वेळेस खेळणार आहे आणि पहिले चार संघ उपांत्य फेरीत जातील त्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यातच भारत व पाकिस्तानचा सामना म्हंटल तर दडपण हे येणारच.
१९७५ ते २०१५ दरम्यानच्या विश्वचषक स्पर्धांत भारत व पाकिस्तानमध्ये ६ सामने खेळले गेले आणि प्रत्येक वेळेस भारतीय संघाने विजय मिळवला आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यांत भारतीय संघाचे पारडे जड असेल यात काही शंका नाही. पाकिस्तानने १९९२ च्या विश्वचषकात विजेतेपद तर १९९९ च्या विश्वचषकात उपविजेतेपद पटकावले होते पण तरी देखील या दोन्ही विश्वचषक स्पर्धांत पाकिस्तानी संघाला भारताकडुन पराभव स्विकारावा लागला होता. बेभरवसा संघ म्हणुन क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या यजमान इंग्लंडला धक्का देत २०१९ च्या विश्वचषकातील आपला पहिला विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीसुद्धा शानदार कामगिरी केली होती. मह्त्त्वाची बाब म्हणजे सलामीवीर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली चांगल्या लयीत दिसत आहेत त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद अमीर, वहाब रियाझ व हसन अलीसमोर आव्हान असेल ते एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या विराट व रोहितचे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत शतक झळकावणारा शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत के एल राहुल रोहितसोबत सलामीला खेळेल त्यामुळे पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न भारतीय क्रिकेट पाठीराख्यांना लागुन राहिला असेल. भारतीय संघाकडे दिनेश कार्तिक व विजय शंकरच्या रुपाने दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे भारतीय संघ कोणाला संधी देतो हे पाहावे लागेल.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांत पाकिस्तानकडुन मोहम्मद हफीज, सरफराज अहमद, बाबर आझम व इमाम उल हक चांगल्या लयीत दिसत आहेत त्यामुळे त्यांना लवकर माघारी धाडण्याची जिम्मेदारी असेल ती जसप्रित बुमराह व भुवनेश्वर कुमारवर. २०१७ चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यांत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरणार यात काही शंका नाही.
संभाव्य संघ:-
भारत:- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, कुलदिप यादव/मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह
पाकिस्तान:- इमाम उल हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीज, सरफराज अहमद (कर्णधार), शोएब मलिक, मोहम्मद अमीर, हसन अली, शहीन आफ्रिदी, असिफ अली, वहाब रियाझ
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply