भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव ढेपाळला होता. अष्टपैलु खेळाडु रोस्टन चेस (४८) व शिमरॉन हेटमायर (३५) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नव्हता आणि दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ८ बाद १८९ झाली होती. वेस्ट इंडिजचा संघ अजुनही १०८ धावांनी पिछाडीवर होता आणि ही पिछाडी कमी करण्याची जिम्मेदारी पुर्णपणे कर्णधार जेसन होल्डरवर होती. होल्डरने कमिन्ससोबत ४१ धावांची भागिदारी करत तीसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना ९ वा गडी बाद करण्यासाठी १४ षटके वाट पाहावी लागली. शेवटी मोहम्मद शमीने जेसन होल्डरला ३९ धावांवर पंतकरवी झेलबाद करत वेस्ट इंडिजला ९ वा धक्का दिला त्यानंतर पुढच्याच षटकांत जडेजाने कमिन्सला त्रिफळाचीत करत वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आणला. भारताकडुन इशांत शर्माने ५, मोहम्मद शमी व रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ तर जसप्रित बुमराहने १ गडी बाद केला.
पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी घेतल्याने भारतीय संघ सुस्थितीत होता त्यामुळे भारताच्या सलामीवीर मयंक अगरवाल व के एल राहुलवर कोणतेही दडपण नव्हते. या दोघांनी सावध सुरुवात करत भारताची आघाडी १०० धावांच्या पार नेली होती. ३० धावांची भागिदारी केल्यानंतर मयंक १६ धावांवर रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर पायचित झाला त्यानंतर पहिल्या डावातील अपयश धुवुन काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने सलामीवीर राहुलसोबत १६ षटकांत ४३ धावा जोडल्या. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते पण चेसच्या गोलंदाजीवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला तर पुढच्याच षटकांत रोचने एका शानदार चेंडूवर चेतेश्वर पुजाराला २५ धावांवर त्रिफळाचीत केले. १ बाद ७३ वरुन भारतीय संघाची अवस्था ३ बाद ८१ झाली होती.
दोन षटकांत दोन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यामुळे भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर आली होती. पहिल्या डावात ९ धावांवर बाद झाल्याने विराट कोहली मोठी खेळी खेळण्यास उत्सुक होता तर पहिल्या डावात ८१ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केल्याने रहाणेचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे विराट-अजिंक्यची जोडी भारतासाठी महत्त्वाची होती. सामन्यांत भरपुर वेळ बाकी असल्याने विराट-अजिंक्यच्या जोडीने सावध पवित्रा घेतला होता.१७ धावांवर असताना जॉन कॅम्बेलने रहाणेचा झेल सोडला पण यानंतर विराट-अजिंक्यच्या जोडीने वेस्ट इंडिजला सामन्यांत परतण्याची संधी दिली नाही. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते त्यातच अजिंक्य रहाणेनी १८ वे कसोटी अर्धशतक तर विराटने २१ वे कसोटी अर्धशतक साजरे केले आणि या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८ वी शतकी भागिदारी केली. महत्त्वाची बाब म्हणजे तीसऱ्या दिवसाच्या तीसऱ्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता ८७ धावा केल्या. तीसऱ्या दिवसअखेर भारताने ३ गडी गमावत १८५ धावा केल्या तर रहाणे ५३ तर विराट ५१ धावांवर नाबाद राहिले. तीसऱ्या दिवसअखेर भारताने २६० धावांची आघाडी मिळवली आहे त्यामुळे आता चौथ्या दिवशी भारताची नजर असेल ती आघाडी ३५०-४०० धावांपर्यंत पोहचवण्याची यात विराट व रहाणेची महत्त्वाची भुमिका असेल. आता हे पाहावे लागेल की भारत चौथ्या दिवसाची सुरुवात कशी करतो ते.
- शंतनु कुलकर्णी
Leave a Reply