१९९७-२०१२ या १५ वर्षांत १४७ कसोटी, २९५ एकदिवसीय व २५ टी-२० सामने यांत अनुक्रमे ५५१५, ४६८६ व २६८ धावा यासोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दित यष्टिमागे ९९९ बळी असा भरभक्कम अनुभव असलेल्या माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची २०२३ च्या विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी केली आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या संघाचे हंगामी प्रशिक्षक असलेल्या एनोच नॅक्वे यांची आता सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर लिंडा झोंडी यांची पुन्हा एकदा निवड समिती अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली आहे. “मार्क बाऊचरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाचा फायदा संघाला होईल”, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सांगितलं.
४३ वर्षीय मार्क बाऊचरकडे टायटन्स संघाच्या प्रशिक्षकपदाचा तसेच मॅझनी सुपर लीग टी-२० मध्ये बाऊचर त्श्वाने स्पार्टन्स संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. मार्क बाऊचरसाठी पहिली परीक्षा असेल ती म्हणजे बॉक्सिंग डे पासुन इंग्लंडविरुद्ध मायदेशात सुरु होणारी मालिका. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे त्याची सुरुवात सेंच्युरीयन येथे बॉक्सिंग डे टेस्ट ने होणार आहे. १६ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची निवड होणार आहे.
– शंतनु कुलकर्णी
Leave a Reply