न्युझिलंड दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवल्यानंतर यजमान न्युझिलंडने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. टी-२० मालिकेतील शानदार कामगिरीनंतर एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन भारतीय संघ कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉ व शुभमन गिल या दोन युवा खेळाडुंपैकी कोणाला मयंक अगरवालसोबत सलामीला खेळण्याची संधी मिळते हे पाहावे लागेल. पृथ्वी शॉने पदार्पणात शानदार कामगिरी केली होती त्यामुळे त्याचीच वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघ ३६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर न्युझिलंडचा संघ ६० गुणांसहं ६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय संघ आपला पहिला क्रमांक मजबुत करण्यास तर यजमान न्युझिलंडचा संघ वरचे स्थान मिळवण्यास उत्सुक असेल.
स्विंग गोलंदाजीस पोषक असलेल्या वातावरणात ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, मॅट हेनरी व निल वॅगनर यांसारख्या तगड्या गोलंदाजांचा आक्रमणाची धार कमी करण्याची जिम्मेदारी असेल ती वरच्या फळीतील फलंदाजांची. त्यामुळे सलामीवीरांची भुमिका महत्त्वाची असणार यात काही शंका नाही. फक्त कसोटी संघाचा भाग असलेले चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे नोव्हेंबर नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणा आहेत. या दोघांनी न्युझिलंड अ व सराव सामन्यांत आश्वासक कामगिरी केली आहे आणि तश्याच कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर न्युझिलंड दौऱ्यात रिषभ पंतला एकही संधी मिळाली नाही आणि टी-२० व एकदिवसीय मालिकेत त्याला संघाबाहेरच राहावे लागले. तसेच मायदेशात दक्षिण आफ्रिका व बांग्लादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत देखील पंतच्या जागी वृद्धिमान साहालाच संधी देण्यात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा साहालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ चार गोलंदाजांसह उतरतो की पाच हे पाहावे लागेल. तसेच खेळपट्टी पाहुन भारतीय संघ चार जलदगती गोलंदाज व एक फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो त्यामुळे हनुमा विहारीला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील काही वर्षांतील परदेश दौऱ्यात भारतीय संघाची अश्विन पेक्षा रविंद्र जडेजाला पसंती राहिली आहे त्यामुळे पहिल्या सामन्यांतही जडेजालाच अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पण जर भारतीय संघ पाच गोलंदाजांसह उतरला तर अश्विनला संधी मिळु शकते.
संभावित संघ:- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, पृश्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा/ उमेश यादव, जसप्रित बुमराह
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply