आजपासुन ऑस्ट्रेलियात सुरु झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सामना होता तो चार वेळेसचा टी-२० विश्वचषक विजेता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध. नुकत्याच झालेल्या तीरंगी टी-२० मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता पण अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ११ धावांनी पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे हा सामना शानदार होणार यात शंका नव्हती. ऑस्ट्रेलिया कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजीस आलेल्या भारताच्या सलामीवीर स्मृती मंधना व शैफाली वर्माने भारताला शानदार सुरुवात करुन देत ४ षटकांत ४१ धावांची सलामी देत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता पण पुढील तीन षटकांत भारताने ३ गडी गमावले आणि भारताची अवस्था ६.४ षटकांत ३ बाद ४७ झाली होती. शानदार सुरुवातीनंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. स्मृती, शैफाली व हरमनप्रितला गमावल्यानंतर भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी आली होती ती जेमिमाह रॉड्रीग्स व दिप्ती शर्मावर. या दोघींनी एक-एक धावा जोडत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन देण्यास हातभार लावला. १६ व्या षटकांत भआरतीय संघाने १०० धावांचा टप्पा पार केला आणि त्याच षटकांत जेमिमाह २६ धावांवर बाद झाली. जेमिमाहनंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीला सोबत घेत दिप्तीने निर्धारित २० षटकांत संघाला १३२ धावांचा टप्पा गाठुन दिला. भारताकडुन दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद ४९ धावा काढल्या तर ऑस्ट्रेलियाकडुन जेस जोनासेनने २ तर एलिस पेरी व डेलिसा किमिंसने १ खेळाडुला बाद केले.
एका शानदार सुरुवातीनंतर भारतीय संघाला १३२ धावांपर्यंत रोखल्याने ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला होता. तसे १३३ धावांचे आव्हान मोठे नव्हते त्यामुळे भारतीय संघाला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती. एलिसा हिली चांगल्या लयीत दिसत होती पण शिखा पांडेनी बेथ मुनीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगला बाद करत राजेश्वरी गायकवाडने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. एका बाजूने हिली जबरदस्त फटकेबाजी करत होती. १० व्या षटकांत चौथ्या चेंडूवर हिलीने षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले पण पुढच्याच चेंडूवर हिली पुनम यादवकडे झेल देऊन परतली.
हिलीचे बाद होणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. हिली बाद झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाला ६१ चेंडूत ६६ धावांची आवश्कता होती. पुनम यादवने आपल्या पुढच्या षटकांत सलग दोन चेंडूवर हेन्स व एलिस पेरी बाद केले. पुनम यादवला हॅट्रिकची संधी आली होती पण जोनासनचा झेल पकडण्यात यष्टिरक्षक तानिया भाटिया अपयशी ठरली. ५ षटकांत २४ धावांत ४ गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या आशा होत्या त्या गार्डनरवर. गार्डनने एक बाजू लावुन धरली होती पण दुसऱ्या बाजूने तीला आवश्यक साथ मिळाली नाही. सामन्यांवर भारतीय संघाने पकड मिळवली होती. शेवटच्या २ षटकांत ऑस्ट्रेलियाला २७ धावांची आवश्यकता होती आणि ऑस्ट्रेलियाचे ३ गडी बाकी होते पण ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त ९ धावाच काढु शकला. शेवटच्या षटकांतील ५ व्या चेंडूवर स्ट्रॅनोला धावबाद करत भारतीय संघाने चार वेळचा टी-२० विश्वकप विजेता ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवत टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. ऑस्ट्रेलियाकडुन एलिसा हिलीने सर्वाधिक ५१ धावा काढल्या तर भारताकडुन पुनम यादवने ४ तर शिखा पांडेनी ३ गडी बाद केले. १९ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या पुनम यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचा पुढील सामना २४ फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध पर्थ येथे खेळविण्यात येणार आहे.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply