१८ जून १९८३ म्हणजे तब्बल ३७ वर्षापुर्वी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार कपिल देवने डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडूत नाबाद १७५ दैदिप्यमान खेळी केली होती. १९७५ व १९७९ या पहिल्या दोन विश्वचषकात निराशाजनक कामगिरी राहिलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव करत केली होती. वेस्ट इंडिज पाठोपाठ भारतीय संघाने झिम्बाब्वेचा फडशा पाडला होता. दोन सामन्यांत दोन विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषकाची धडाक्यात सुरुवात केली होती. पण पुढच्याच सामन्यांत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल १६२ धावांनी तर वेस्ट इंडिजविरुद्ध ६६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. चार सामन्यांत भारताला दोनच विजय मिळवता आले होते त्यामुळे उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता.
साखळीतील भारताचे झिम्बाब्वे व ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने बाकी होते त्यामुळे त्यात विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक होते. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या सामन्यांत भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १५५ धावांवर रोखले होते त्यामुळे या सामन्यांतही भारताकडुन कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती. कर्णधार कपिल देवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता पण हा निर्णय भारताच्याच अंगाशी आला होता आणि पीटर रॉसन व केविन करण या जलदगती गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीस सुरुंग लावत भारताची अवस्था ५ बाद १७ केली होती. ९ धावांत ४ गडी गमावले त्यावेळेस कर्णधार कपिल देव फलंदाजीस आला होता पण त्यानंतर यशपाल शर्माच्या रुपाने १७ धावांवर भारताला ५ धक्का बसला होता. १७ धावांत अर्धा संघ माघारी परतल्याने भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता आणि डाव सावरण्याची जिम्मेदारी आली होती ती कर्णधार कपिल देववर. आता कपिल देवला खालच्या क्रमांकावरील फलंदाज त्याला कशी साथ देतात याकडे सर्वांचे लक्ष होते. कपिल देवने रॉजर बिन्नीला सोबत घेत डाव सावरत ६ व्या गड्यासाठी ६० धावा जोडत पडझड थांबवली होती पण रॉजर बिन्नी (२२) व रवि शास्त्री (१) झटपट माघारी परतल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. कपिल देव मात्र चांगल्या लयीत दिसत होता आणि झिम्बाब्वे समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची त्याच्यावरच होतीच.
कपिल देव शानदार फटकेबाजी करत होता आणि मदन लाल ही त्याला चांगली साथ देत होता. कपिल देव – मदन लालची भागिदारी भारताला मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता त्यातच केविन करणने मदन लालला १७ धावांवर बाद करत ६२ धावांची भागिदारी तोडली होती. रॉजर बिन्नी व मदन लालने कपिलला चांगली साथ दिली होती पण कपिलला महत्त्वाची साथ दिली ती यष्टिरक्षक सय्यद किरमाणीने. एकीकडे गडी बाद होत असताना कपिलने आपला आक्रमक पवित्रा मात्र कायम ठेवला होता. ४९ व्या षटकांत कपिलने आपल्या पहिल्या वहिल्या शतकाला गवसणी घातली होती. डावातील आणखीन ११ षटके बाकी होती आणि या ११ षटकांत कपिलने तब्बल ७५ धावा वसुल करत संघाला ६० षटकांत २६६ धावांपर्य़ंत मजल मारुन दिली होती. यात कपिल (१७५*) व किरमानी (२४*) ने ९ व्या गड्यासाठी केलेल्या १२६ धावांच्या भागिदारीचे योगदान महत्त्वाचे होते आणि गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २३५ धावांवर रोखत संघाला ३१ धावांनी विजय मिळवून दिला होता. १६ चौकार व ६ षटकारांच्या सहाय्याने १३८ चेंडूत १७५ धावांची नाबाद खेळी भारतासाठी पहिली वहिली शतकी ठरली होती आणि कपिलच्या १७५ धावांच्या खेळीने ग्लेन टर्नरने १९७५ मध्ये केलेल्या नाबाद १७१ धावांचा विक्रम तोडत विक्रमावर आपले नाव कोरले होते आणि त्यानंतर १९८७ वेस्ट इंडिजच्या व्हिव रिचर्डसने १८१ धावांची खेळी करत विक्रम तोडला होता.
या खेळीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे १७ धावांत ५ गडी गमावल्यानंतर कपिलने खेळलेली १७५ धावांची नाबाद खेळी महत्त्वाची होती आणि कधी ही हार न मानण्याच्या वृत्तीने ही खेळी भारतीय संघाला प्रेरणा देणारी ठरली होती आणि याच जिद्दीच्या बळावर दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यांत पराभावाची धुळ चारत संघाला विश्वविजेतपद मिळवुन दिले होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे बीबीसीच्या संपामुळे सामना प्रक्षेपित करण्यात आला नव्हता त्यामुळे मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक वगळता कोणलाही हा सामना पाहता आला नाही आणि त्या ऐतिहासिक सामन्याची क्षणचित्रे उपलब्ध नाहीत.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply