१९७५ व १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या दोन विश्वचषकात भारतीय संघाला नवोदित ईस्ट आफ्रिका संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला होता. पहिल्या दोन्ही विश्वचषकावर क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले नाव कोरले होते महत्त्वाचे म्हणजे सलग तीसरी विश्वचषक स्पर्धाही इंग्लंडमध्येच खेळविण्यात येत होती. सलग तिसरे विश्वविजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने वेस्ट इंडिजचा संघ तर भारतीय संघ २४ वर्षीय अष्टपैलु खेळाडु कपिल देवच्या नेतृत्वात स्पर्धेत सहभागी झाला होता.
पहिल्या दोन स्पर्धांतील अपयश धुवुन काढण्याच्या उद्देशाने भारतीय संघ स्पर्धेत दाखल झाला होता आणि भारतीय संघाचा पहिला सामना होता तो दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीजविरुद्ध. या सामन्यांत वेस्ट इंडिजचे पारडे जड वाटत होते पण भारतीय संघाने ३४ धावांनी विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पहिल्याच सामन्यांत संभाव्या विजेता वेस्ट इंडिज संघावर विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता.दोन सामन्यांत दोन विजय अशी धडाक्यात सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. आता उपांत्या फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक होता.झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांत भारतीय संघाची अवस्था ५ बाद १७ झाली होती आणि भारतीय संघाचा पराभव डोळ्यासमोर दिसत होता पण कर्णधार कपिल देवने १३८ चेंडूत १७५ धावांची नाबाद खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली होती आणि संघाला विजय मिळवून देत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले होते. उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचा ६ गड्यांनी पराभव करत भारतीय संघ पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला होता.
अंतिम सामन्यांत भारताचा सामना होता तो १९७५ व १९७९ च्या विश्वचषकाचा विजेता वेस्ट इंडिजसोबत. या विश्वचषकात दोन्ही संघ दोन वेळेस एकमेकांसमोर आले होते आणि त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक वेळेस विजय मिळवला होता पण तरीही वेस्ट इंडिजकडेच विजेतेपदाचा दावेदार म्हणुन पाहिले जात होते.वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अॅडी रोबर्टस, जोएल गार्नर, मायकेल होल्डींग आणि माल्कम मार्शल यांसारख्या तगड्या गोलंदाजांचे भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान होते. २ धावांवर सुनिल गावसकरला बाद करत रॉबर्टसने बाद करत भारताला पहिला धक्का दिला होता. गावसकर बाद झाल्यानंतर कृष्णम्माचारी श्रीकांत व मोहिंदर अमरनाथ डाव सावरला होता. श्रीकांत चांगले फटके खेळत होता मात्र मोहिंदर अमरनाथला एक-एक धावेसाठी झगडावे लागत होते. संदिप पाटिल (२७) व कर्णधार कपिल देवने चांगली सुरुवात केली होती पण भारतीय संघ थोड्या थोड्या अंतराने गडी गमवत होता आणि वेस्ट इंडिजच्या तगड्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाचा डाव ५४.४ षटकांत १८३ धावांत संपुष्टात आला होता. भारतीय संघाकडुन सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या तर वेस्ट इंडिजकडुन रॉबर्टसने ३, गार्नर, होल्डींग व लॅरी गोम्सने प्रत्येकी २ तर गार्नरने १ गडी बाद केला होता.
गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स, व्हिव रिचर्डस, क्लाईव्ह लॉईड यांसारख्या तगड्या फलंदाजीसमोर १८४ धावांचे आव्हान तसे माठे नव्हते. वेस्ट इंडिजचा संघआ आपल्या सलग तीसऱ्या विश्वचषक विजेतेपदापासुन १८४ धावा दुर होता. आव्हान तसे लहानच होते पण अंतिम सामन्यांतील दबाव पाहता आव्हान २००-२१० दिसत होते. तसे पाहिले तर वेस्ट इंडिजचा अनुभव पाहता त्यांच्याकडेच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणुन पाहिले जात होते. भारताला सामन्यांत पुनरागमन करायचे असल्यास त्यांना चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती आणि बलविंदर सिंग संधुने ग्रिनिजला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले होते. ग्रिनिजनंतर मैदानात उतरलेल्या व्हिव रिचर्डसने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात केली होती तर दुसरीकडे हेन्सने सावध पवित्रा घेतला होता. बघता-बघता दोघांनी संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या होत्या. रिचर्डसचा पवित्रा पाहता तो संघाला सहज विजय मिळवून देईल असे दिसत होते. मदन लालने हेन्सला १३ धावांवर बाद केल्यानंतर कपिल देवने शानदार झेल घेत भारताच्या विजयातील मोठा अडथळा व्हिव रिचर्डसला ३३ धावांवर माघारी धाडत सामन्यांत पुनरागमन केले होते. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची अवस्था १ बाद ५० वरुन ६ बाद ७६ केली होती.
वरच्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडत भारतीय संघाने सामन्यांवर चांगली पकड मिळवली होती. आता मैदानात होते ते यष्टिरक्षक जेफ्री दुजॉं व माल्कम मार्शल. दुजॉं व मार्शलने पडझड थांबवली होती आणि ही जोडी जमली असे दिसत होते. जोडी धोकादायक ठरताना दिसते असे वाटत असतानाच मोहिंदर अमरनाथने दुजॉंला २५ धावांवर बाद करत ४३ धावांची भागिदारी तोडली होती. भारतीय संघ आपल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक विजेतेपदाजवळ पोहचला होता. आता फक्त विजयावर शिक्कामोर्तब करणे बाकी राहिले होते शेवटी मोहिंदर अमरनाथने मायकेल होल्डींगला पायचित करत संघाला ४३ धावांनी विजय मिळवुन देत वेस्ट इंडिजचे सलग तीसरे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि भारतीय संघाने पहिल्या वहिल्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली होती. वेस्ट इंडिजकडुन व्हिव रिचर्डसने सर्वाधिक ३३ धावा केल्या होत्या तर भारताकडुन मोहिंदर अमरनाथ व मदन लालने प्रत्येकी ३, बलविंदर सिंग संधुने २ तर कपिल देव व रॉजर बिन्निने १ गडी बाद केला होता. सामन्यांत २६ धावा व १२ धावांत ३ बळी अशी अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या मोहिंदर अमरनाथला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले होते. भारतीय संघाची १९७५ व १९७९ या दोन विश्वचषकातील कामगिरी पाहता १९८३ च्या विश्वचषकाच्या सुरुवातीला कोणीच भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणुन पाहत नव्हते पण कधी ही हार न मानण्याच्या वृत्ती आणि जिद्दीच्या बळावर दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यांत पराभावाची धुळ चारत संघाला विश्वविजेतपद मिळवुन दिले होते. हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक शानदार दिवस होता. तसं पाहिल तर १९८३ च्या विश्वचषक विजेतेपदाने खऱ्या अर्थाने भारतात क्रिकेटला एक वेगळे स्थान मिळवुन दिले.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply