स्टुअर्ट ब्रॉड ५०० नाबाद

स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजीचा कणा. स्टुअर्ट ब्रॉडचा जन्म १९८६ मध्ये नॉंटिंगहॅम मध्ये इंग्लंडचा फलंदाज ख्रिस ब्रॉडच्या घरात झाला होता. महत्त्वाचे म्हणजे स्टुअर्टच्या वडिलांनी देखील १९८४ ते १९८९ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ते सध्या सामनाधीकारीची भुमिका निभावत आहेत.  स्टुअर्ट ब्रॉडने २००५ मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती आणि त्यानंतर २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडकडुन पदार्पणाचा सामना खेळला. २००७ मध्ये भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेतही ब्रॉडने ७ सामन्यांत ९ बळी घेत मालिका विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. पदार्पणापासुन ते २००७ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत ब्रॉडकडे एक जलदगती गोलंदाज म्हणुनच पाहिले जात होते पण २००७ च्या टी-२० विश्वचषकात सुपर सिक्सच्या भारताविरुद्धच्या सामन्यांत युवराज सिंगने ब्रॉडचा समाचार घेत डावाच्या १९ व्या षटकात तब्बल ६ षटकार मारण्याची किमया केली होती. १९ व्या षटकांत गेलेल्या ३६ धावांसह ब्रॉडने सामन्यांत ४ षटकांत तब्बल ६० धावा दिल्या आणि तेव्हा पासुन ब्रॉड सर्वांनाच परिचीत झाला होता.

फ्लिंटॉफ, साईडबॉटम, अॅडरसन, ट्रेमलेट यांसारखे गोलंदाज असल्याने ब्रॉडला सुरुवातीला जास्त संधी मिळत नव्हत्या. २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांत ब्रॉडने पहिल्यांदाच डावात ५ बळी मिळवण्याची किमया केली होती आणि त्यानंतर तो इंग्लंडच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग बनला होता. स्टॉस व कुकच्या कर्णधारपदाच्या काळात तर त्याची कारकिर्द बहरली होती. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड व दक्षिण आफ्रिकेत खेळताना ब्रॉडची गोलंदाजी फलंदाजांच्या नाकीनऊ आणत होती पण तसा प्रभाव त्याला इतर ठिकाणी पाडता आला नाही.त्यातला त्यात इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी चांगलीच आग ओकत होत मग समोर कोणताही संघ असो. २०१३-१४ च्या अॅशेस मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाला सळो की पळो करुन सोडले होते.

२०१५ मध्ये नॉटिंगहॅम मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ६० धावांवर रोखले होते त्यात ब्रॉडने १५ धावांत ८ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडेच मोडले होते. १५ धावांत ८ गडी ही ब्रॉडची कसोटीतील डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. एकीकडे ब्रॉडची कसोटी कारकिर्द बहरत असताना १४ वर्षांच्या कारकिर्दीत ब्रॉडने १२१ एकदिवसीय व ५६ टी-२० सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे त्यात त्याने अनुक्रमे १७८ व ६५ बळी पटकावले आहेत. २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकानंतर ब्रॉड फक्त २ एकदिवसीय सामने खेळला आहे तर २०१४ च्या टी-२० विश्वचषकात तो आपला शेवटचा टी-२० सामना खेळला आहे. एकदिवसीय व टी-२० संघाचा भाग नसला तरी तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा खेळाडु आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यांत आणि आपल्या १४० कसोटी सामन्यांत त्याने ५०० बळींचा टप्पा पार केला आहे. गोलंदाजीपाठोपाठ त्याने फलंदाजीतही त्याने ३२८४ धावा केल्या आहेत. ५०० बळी व ३००० पेक्षा अधिक धावा अशी दुहेरी कामगिरी केलेला ब्रॉड हा शेन वॉर्ननंतर दुसरा खेळाडु ठरला आहे.

 ५०० बळी घेणारा ब्रॉड चौथा जलदगती गोलंदाज आहे तर सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे.महत्त्वाचे म्हणजे त्याचा गोलंदाजीचा सहकारी अॅडरसन ६०० बळीच्या जवळ पोहचला आहे. अॅडरसन आणि ब्रॉड हे इंग्लंडच्या गोलंदाजीचा कणा आहेत असे म्हंटले तर ते चूकीचे ठरणार नाही. अॅडरसन आणि ब्रॉड या दोघांचा ५०० वा बळी हा वेस्ट इंडिजचा क्रेग ब्राथवेट राहिला आहे. ५०० बळीं पैकी ३२० बळी ब्रॉडने मायदेशात घेतले आहेत तर दुसरे सर्वाधिक ४५ बळी त्याने दक्षिण आफ्रिकेत घेतले आहेत पण यामुळे एखाद्या गोलंदाजाचे महत्त्व कमी होत नाही. सध्या तो ३४ वर्षांचा आहे पण त्याची गोलंदाजी आणि त्याचा फिटनेस पाहता तो ६०० बळीचा टप्पा ही पार करु शकतो. एकवेळ इयान बोथम (३८३) सर्वाधिक बळींच्या यादीत एकमेव इंग्लिश खेळाडु होते पण सध्या अॅडरसन व ब्रॉडच्या रुपाने दोन गोलंदाज पहिल्या सात मध्ये आहेत. २००७ चा टी-२० विश्वचषक ते २०२० यात ब्रॉडने जी काही झेप घेतली आहे ते कौतुकास पात्र आहे यात काही शंका नाही. आता अॅडरसन व ब्रॉड ही जोडी कुठ पर्यंत आगेकुच करते हे पाहावे लागेल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: