कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल चार महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ आर्यलॅंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला.त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मॅंचेस्टर येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांत यजमान इंग्लंडने तीन गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यांत नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत शान मसुद (१५६) व बाबर आझमच्या अर्धशतकाच्या बळावर संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. पण ३२६ धावांना प्रत्युतर देताना ओली पोप (६२) वगळता दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकु शकला नव्हता आणि इंग्लंडचा पहिला डाव फक्त २१९ धावांत आटोपला होता.पहिल्या डावात तब्बल १०७ धावांची आघाडी घेत पाकिस्तानने सामन्यांवर वर्चस्व मिळवले होते त्यामुळे यजमान इंग्लंडचा संघ काहीसा दडपणात होता पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला दुसऱ्या डावात १६९ धावांवर रोखत संघाला सामन्यांत परत आणले होते.जवळपास सामन्यांतील ५ सत्र बाकी असल्याने सामन्यांचा निकाल लागणार हे निश्चित होते. २७७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था ५ बाद ११७ झाली होती त्यामुळे पाकिस्तानचा संघ इंग्लंडला पराभवाचा धक्का देतो की काय असेच वाटत होते पण ख्रिस वोक्स (नाबाद ८४) जोस बटलर (७५) यांनी ७ व्या गड्यासाठी १३९ धावांची भागिदारी करत संघाचा विजय निश्चित केला होता.शेवटी वोक्सने संघाला ३ गडी राखुन विजय मिळवुन देत मालिकेत १-० ने आघाडी मिळवुन दिली होती.
पाकिस्तान विजय मिळवेल असे वाटत असताना वोक्स व बटलरच्या भागिदारीने पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरले. दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवुन मालिकेत बरोबरी साधण्यास पाकिस्तानचा संघ उत्सुक असेल पण यासाठी पाकिस्तान संघाला संघात काही बदल करावे लागु शकतात तर दुसरीकडे इंग्लंड संघाचा उपकर्णधार व अष्टपैलु खेळाडु बेन स्टोक्स उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाचा भाग नसेल त्यामुळे इंग्लंड संघाला त्याची कमतरता जाणवेल यात काही शंका नाही आणि याचा फायदा पाकिस्तानचा संघ घेऊ शकतो का हे बघावे लागेल.स्टोक्सच्या जागी अष्टपैलु सॅम करनला संधी मिळण्याची शक्यता आहे.पाकिस्तान संघाचा विचार करता पाकिस्तानची फलंदाजीची जिम्मेदारी पुर्णपणे बाबर आझम, कर्णधार अझर अली, असद शफीक व शान मसुदवर असेल.तसेच अबिद अलीच्या जागी इमाम उल हक तर नसीम शाहच्या जागी अनुभवी गोलंदाजाला संधी मिळु शकते. साउदाम्पटनची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांस अनुकुल असल्याने दोन्ही संघांच्या फलंदाजांची परीक्षा असेल हे मात्र नक्की.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply