वेस्ट इंडिज, आर्यलॅंड, पाकिस्तान पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-२० सामने अनुक्रमे ४,६ व ८ सप्टेंबरला ओल्ट ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर येथे तर एकदिवसीय सामने ११, १३ व १६ सप्टेंबरला एग्ज बॉउल,हॅम्पशेअर येथे खेळविण्यात येणार आहेत.
या मालिकेसाठी अॅरॉन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने तब्बल २१ जणांचा संघ जाहीर केला आहे त्यात यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या जागी पॅट कमिन्सची उपकर्णधारपदी नेमणुक केली आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१९ च्या विश्वचषकानंतर संघाबाहेर गेलेल्या मार्कस स्टॉयनिस व ग्लेन मॅक्सवेलला सुद्धा संघात स्थान देण्यात आले आहे तर डार्सि शॉर्ट, उस्मान ख्वाजा, बेन मॅकडर्मॉट, ट्रेविस हेड व मायकेल नेसर यांना वगळले आहे. रिली मेरेडिथ, जोश फिलिप्स व डॅनियल सॅम्स या नवख्या खेळाडुंना पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडविरुद्धची मालिका सप्टेंबर माहिन्याच्या सुरुवातीला होणार आहे आणि ऑस्ट्रेलिया संघाचे वरिष्ट सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या अॅड्र्यु मॅक्डोनाल्डची राजस्थान रॉयल्स संघाने प्रशिक्षकपदी नेमणुक केली असल्याने ते संघासोबत इंग्लंडला जाणार नाहीत त्यामुळे ते राजस्थान संघासोबत युएई मध्ये जोडले जातील तसेच इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघां दरम्यानच्या मालिकेचा फटका मुंबई इंडियन्स वगळता आयपीएल मधील सर्वच संघांना बसेल कारण अॅरॉन फिंच, केन रिचर्डसन व जोश फिलिप्स (तिघेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), पॅट कमिन्स(कोलकत्ता नाईट रायडर्स), डेविड वॉर्नर व मिशेल मार्श (दोघेही सनरायझर्स हैद्राबाद), स्टिव्ह स्मिथ व अॅड्र्यु टाय (दोघेही राजस्थान रॉयल्स), ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब), जोश हॅजेलवुड (चैन्नई सुपर किंग), अॅलेक्स कॅरी व मार्कस स्टॉयनिस (दोघेही दिल्ली कॅपिटल्स) यांसारखे तगडे खेळाडु सुरुवातीच्या काही सामन्यांत संघाचा भाग नसतील त्यामुळे संघाना पहिल्या काही सामन्यांत उपलब्ध असलेल्या खेळाडुंवरच अवलंबुन राहावे लागेल.
संघ – अॅरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुश्ने, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मिशेल मार्श,मार्कस स्टॉयनिस, सीन अॅबॉट,जोश फिलिप्स, डॅनियल सॅम्स, जोश हॅजेलवुड, अॅस्टन अगर, रिली मेरेडिथ, मॅथ्यु वेड, नॅथन लायन, केन रिचर्डसन, अॅलेक्स कॅरी, अॅडम झंपा, अॅड्र्यु टाय
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply