५ फ्रेब्रुवारीपासून भारत व इंग्लंड दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नई मध्ये सुरुवात होत आहे. दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यातील मालिका रद्द झाल्यामुळे न्युझिलंडचा संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणताही सामना खेळणार नाही त्यामुळे त्यांना जर आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांना भारत व इंग्लंड दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांतील एक जागेसाठी भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेत आहेत त्यामुळे ४ सामन्यांची कसोटी मालिकेवर भारत व इंग्लड संघांच्या समर्थकां बरोबरचं ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांच लक्ष्य असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारत व इंग्लंडने आपली या आधीच मालिका अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेविरुद्ध जिंकली आहे त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास दोन्ही उत्सुक असतील.
ऑस्ट्रेलियात २-१ ने मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल यात काही शंका नाही आणि त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ इंग्लंडसमोर उभा ठाकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कोविड विषाणुच्या प्रादुर्भावानंतर खेळविण्यात येणारी भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. भारत दौऱ्यापुर्वी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-० ने विजय मिळवत शानदार कामगिरी केली आहे त्यामुळे मालिका शानदार होणार यात शंका नाही. मालिका मायदेशात होत असल्याने भारतीय संघाचेच वर्चस्व असणार यात काही शंका नाही. तसे पाहिले तर मोईन अली वगळता इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाजांना भारतात खेळण्याचा तितकासा अनुभव नाही त्यामुळे फिरकी गोलंदाजीस अनुकुल असणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्यांचा कस लागणार आहे.
इंग्लंड संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती श्रीलंका दौऱ्यात दोन सामन्यांत ४२६ धावा पटकावणाऱ्या कर्णधार जो रुट,जोस बटलर व श्रीलंका दौऱ्यात विश्रांती दिलेल्या बेन स्टोक्सवर तर गोलंदाजीची मदार जोफ्रा आर्चर, जेम्स अॅडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अलीसोबतच बेन स्टोक्सवर असेल. २०१६-१७ मध्ये झालेल्या मालिकेत अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या मोईन अली कडुन तश्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची इंग्लंड संघाला अपेक्षा असेल. २०१६-१७ मध्ये झालेल्या ५ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ४-० ने पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे रुटच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ आपली भारतातील कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करताना दिसेल.
भारतीय संघाचा विचार करता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व शुभमन गिलवर तर गोलंदाजीची मदार असेल ती रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, इशांत शर्मावर. जसप्रित बुमराह पहिल्यांदाच मायदेशात कसोटी सामना खेळताना दिसणार आहे तर २०१६-१७ मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्ध च्या मालिकेत २४ बळी व २२४ धावा अशी अष्टपैलु कामगिरी केलेल्या रविंद्र जडेजाची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवेल पण त्याच्या अनुपस्थिती कुलदिप यादव व वॉशिंग्टन सुंदरला अश्विनची साथ द्यावी लागेल.
संभावित संघ
भारत- विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, कुलदिप यादव
इंग्लंड – जो रुट (कर्णधार), जोस बटलर, रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, डॉम बेस, जॅक लिच, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड
ड्रीम टीम – रोहित शर्मा(कर्णधार), विराट कोहली, जो रुट(उपकर्णधार), शुभमन गिल, बेन स्टोक्स, जोस बटलर, रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, मोईन अली, जोफ्रा आर्चर, इशांत शर्मा
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply