भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या भारत वि. इंग्लंड मालिकेला काल चैन्नईमध्ये सुरुवात झाली आहे.पहिल्या दिवशी ३ बाद २६३ इंग्लंडसाठी शानदार सुरुवात होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुट १२८ धावांवर नाबाद होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला मोठ्या धावसंख्येपासुन रोखण्यासाठी भारताला दुसऱ्या दिवशी झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती.दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात रुट व स्टोक्सने सावध पवित्रा घेतला होता पण जम बसल्यानंतर स्टोक्स नदिम व वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचा समाचार घेतला त्यामुळे स्टोक्सने धावसंख्येला वेग दिला. स्टोक्सचा आक्रमक पवित्रा पाहता रुटने सावध पवित्र्यास प्राधान्य दिले.स्टोक्सविरुद्ध शानदार रेकॉर्ड असणाऱ्या रविचंद्रन अश्विनने सुद्धा सर्व प्रयत्न केले पण त्याला यश मिळाले नाही.
कर्णधार कोहलीने गोलंदाजीत सर्व बदल केले पण रुट व स्टोक्सने भारतीय संघाला यश मिळू दिले नाही.नदिमच्या गोलंदाजीवर एक धाव घेत जो रुटने सलग तीसऱ्या सामन्यांत १५० धावांचा टप्पा पार केला तर त्यापाठोपाठ बेन स्टोक्सने आपले अर्धशतक साजरे केले.दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत इंग्लंडने ३ गडी गमावत ३५५ धावा केल्या आहेत तर रुट १५६ धावांवर तर स्टोक्स ६३ धावांवर नाबाद होते. दुसऱ्या सत्रात देखिल स्टोक्सने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता त्यातच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोक्स ८२ धावा काढुन नदिमच्या गोलंदाजीवर पुजाराकडे झेल देऊन परतला होता. स्टोक्सनंतर मैदानात आलेल्या ओली पोपने देखिल जो रुटला चांगली साथ दिली.रुट-पोपच्या जोडीने देखिल भारतीय गोलंदाजांना संधी दिल्या नाहीत त्यातच एक शानदार षटकार खेचत रुटने आपले तीन सामन्यांतील दुसरे तर कारकिर्दीतले पाचवे द्विशतक साजरे केले आणि बघता-बघता याजोडीने दुसरे सत्र ही खेळुन काढले तेव्हा इंग्लंडने ४ गडी गमावत ४५४ धावा केल्या होत्या.
इंग्लंड तीसऱ्या सत्रातील काही षटके खेळुन पहिला डाव घोषित करेल असे वाटत होते पण तीसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच पोप(३४) व रुटला (२१८) बाद करत भारतीय गोलंदाज इंग्लंडचा डाव गुंडाळतील असे दिसत असतानाच जोस बटलरने डॉम बेसला सोबत घेत सातव्या गड्यासाठी ४८ धावा जोडल्या होत्या. इशांत शर्माने दोन सलग चेंडूवर बटलर (३०) व जोफ्रा आर्चरला त्रिफळाचीत केले होते त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडच्या डाव गुंडाळेल असे दिसत होते पण त्यानंतरही डॉम बेस नाबाद २८ व जॅक लिच नाबाद ६ या ९ व्या व १० व्या क्रमांकावरील फलंदाजांनी दुसऱ्या दिवसअखेर संघाला ८ गडी गमावत ५५५ धावांपर्यंत पोहचवले. आता तीसऱ्या दिवशी भारतीय संघ कधी फलंदाजीस येतो ते पाहावे लागेल.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply